Monday, September 7, 2015

वासोटा..... एक निसर्गरम्य दुर्ग भ्रमंती.....

              दुर्ग भ्रमंती आणि ती सुद्धा सह्याद्रीच्या पायघड्यांवर ही केवळ मराठी माणसासाठीच नवे तर प्रत्येक भारतीयाला मिळालेली एक निसर्गाची देणगीच आहे.विशेषत: पश्चिम महाराष्ट्राच्या पट्ट्यामध्ये राहणाऱ्या 'घाटी' लोकांकरिता भारताच्या पश्चिम घाटावर कातळ काड्यांनी नटलेला हा  सह्याद्री म्हणजे अरबी समुद्र आणि सह्याद्रीचे पठार यामधला एक विभाजक.पठारी प्रदेशातून कोकणात उतरण्यासाठी घाटामधुन प्रवास करावा लागतो. अशाच या विभाजाक सह्याद्रीची साक्ष देत "किल्ले वासोटा" आजतागायत त्याच दिमाखात उभा आहे.मुळात वासोट्यावर उभे राहिल्यावर पश्चिमेकडे असणारा चिपळूण आणि पूर्वेकडे दिसणारा  सह्याद्रीचा  पठारी प्रदेश पाहून महाराष्ट्राची  निसर्ग संपन्नता दिसून येते.

                         शिलाहारकालीन राजांनी हा किल्ला बांधला. या किल्ल्याची मूळ बांधणी ही शिलाहार वंशीय दुसर्‍या भोजराजाने केली असल्याचा उल्लेख आढळतो.वासोट्याचे नाव शिवाजी महाराजांनी व्याघ्रगड असे ठेवले. याच्या दुर्गमतेबद्दल पेशवाईत सुद्धा नोंद आहे. शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा वापर 'तुरुंग' म्हणून केला जात असे. याचे कारण तेथील निर्जन व घनदाट असे अरण्य. पूर्वी तेथे वाघ, बिबट्यांसारखे प्राणीही होते.शिवाजी महाराजांनी  जावळी जिंकल्यानंतर आसपासचे अनेक किल्ले घेतले, पण वासोटा जरा दूर असल्याने घेतला नाही. पुढे शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकले असताना, आपल्या मुखत्यारीत मावळातील पायदळ पाठवून त्यांनी वासोटा किल्ला दि ६ जून १६६० रोजी घेतला.अफझलखाच्या वधानंतर महाराजांच्या दोरोजी या सरदाराने राजापुरावर हल्ला करून तेथील इंग्रजांना अफझलखानाच्या गलबतांचा पत्ता विचारला. त्यांनी सांगितला नाही म्हणून इंग्रजांच्या ग्रिफर्ड नावाच्या अधिकार्‍याला अटक केली व वासोट्यावर ठेवले. .सन १६६१ मध्ये पकडलेल्या इंग्रज कैद्यांपैकी रेव्हिंग्टन, फॅरन व सॅम्युअल यांना वासोट्यावर कैदेत ठेवण्यात आले होते. पुढे १६७९ मध्ये वासोटा किल्ल्यावर २६,००० रुपये सापडले. पुढच्या काळात १७०६ मध्ये ताई तेलिणीने हा किल्ला आपल्या हातात घेतला. पुढील वर्षी पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांनी ताई तेलिणीबरोबर लढाई केली. आठदहा महिन्यांच्या प्रखर झुंजीनंतर ताई तेलिणीचा पराजय झाला आणि १७३० मध्ये वासोटा किल्ला बापू गोखल्यांच्या हाती पडला.
त्यासंबंधी एका जुन्या आर्येमध्ये वासोट्याचा गमतीचा उल्लेख आहे.
 तो असा --
श्रीमंत पंत प्रतिनिधी यांचा अजिंक्य वासोटा;
तेलिण मारी सोटा, बापू गोखल्या सांभाळ कासोटा.
           कोयना वन्यजीव अभयारण्याच्या परीक्षेत्रामध्ये वासोट्याचा परिसर समाविष्ट आहे.मुळांत गड चढण्यासाठी जंगलातून असलेली वाट यांमुळे वासोटा चढायला एक वेगळाच हुरुप येतो.वासोट्याला जाण्यासाठी प्रामुख्याने दोन मार्ग आहेत. एक कोकणमधून आणि दुसरा घाटमाथ्यावरुन. कोकणातील चिपळूण कडून वासोट्याच्या पश्चिम पायथ्याच्या चोरवणे या गावापर्यंत गाडीमार्ग असून या मार्गावर राज्य परिवहन मंडळाच्या (एस.टी.बस) गाड्या आहेत. चोरवणेपासून नागेश्वराच्या सुळक्याकडून वासोट्याकडे येता येते. दुसरा मार्ग हा जास्त सोयीचा आहे.साताऱ्यापासून ४० कि.मी. अंतरावर बामणोली गावापर्यंत स्वत:च्या किंवा राज्य परिवहन मंडळाच्या (एस.टी.बस) वाहनाने पोहोचता येते.सातारा ते बामणोली या प्रवासामध्ये लागते ते कासचे पठार.कासच्या पठाराचे वैशिष्ट्य असे की हे जगातील सर्वात मोठे नैसर्गीकरीत्या फुले उमलणारे पठार आहे.त्यामुळे या दुर्गभ्रमंतीला जाताना किंवा येताना कासच्या पठारावर फेरफटका मारता येईल. बामणोली पासून वासोटा २२ कि.मी. अंतरावर आहे.परंतु कोयना धरणाच्या पाठीमागे आलेल्या पाण्यामुळे शिवसागर जलाशय तयार झाला आहे. ह्या जलाशयातून हे अंतर आपणास नावेतून पार करावे लागते.१-१२ लोकांसाठी साधारणपणे ३५०० रुपये खर्च येतो. पहिल्यांदा नावेसाठी नाव नोंदवून अभयारण्याच्या वन अधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक असते.नावेसाठी नाव नोंदवण्यास सकाळी ८ वाजेपर्यंत बामणोली मध्ये पोचणे आवश्यक असते.किंवा एक दिवस आगोदर जरी गेले तरी राहायची सोय बामणोली गावामध्ये आहे.अभयारण्यात प्रवेश करण्यासाठी प्रवेश फी वेगळी आहे. आपल्याबरोबर असलेला नावाडीच हा या प्रवासासाठीच गाईड असतो.ही सर्व जमवा जमाव झाली की मग सुरु होतो तो नावेतील प्रवास.शिवसागर जलाशयाचे पाणी अतिशय स्वच्छ असून कुठ्ल्याहीप्रकारची औद्योगिक वसाहत तेथे नसल्यामुळे पाणी दुषित व्हायची शक्यता नाही.मित्रांची  चांगली सोबत  असेल तर मग ही सव्वा तासाची नावेची सफर कधी पूर्ण होते ते कळतच नाही.

                   नावेच्या सफरी नंतर सुरु होतो तो गवताळ प्रदेशाचा भाग.जवळपास १ कि.मी. चालल्यानंतर कोयना अभयारण्याच्या प्रवेशद्वारापर्यंत आपण पोहोचतो.तिथेच कोयना अभयारण्याचे कार्यालय आहे.या कार्यालयालगतच एक संग्रहालय आहे. या संग्रहालय मध्ये वनातील मेलेल्या जनावारचे अवशेष तसेच एक वन्यजीवांच्या चित्रांचे प्रदर्शन पहावयास मिळते.इथून पुढे सुरु होते ती खरी जंगल सफर.वनातून आखून दिलेल्या वाटेने जाताना निसर्गातील विविध वृक्षांचे प्रकार पहावायास  मिळतात.आम्हाला या वनामध्ये 'वायपर स्नेक' आणि 'गवा' पहावयास मिळाला.गव्याचे चे अस्तित्व या परिसरातील वाघांची उपस्थिती दर्शवून देतात.अर्धाअधिक किल्ला चढल्यावर एक वाट उजवीकडे जाते. ही वाट केतकीच्या गाद्याजवळून पुढे नागेश्वराकडे जाते. सरळ वाटेने वर चढल्यावर जंगल विरळ होऊन कारवीचे रान लागते. कारवीच्या रानातून वर चढल्यावर किल्ल्याच्या पायर्‍या लागतात. त्या चढून भग्न प्रवेशद्वारातून गडात प्रवेश होतो.साधारणपणे तीन तासांच्या चढानंतर आपण किल्ल्यावर पोहोचतो.किल्ला चढताना काही काही ठिकाणे अशीसुद्धा येतात की जेथे सूर्याची किरणे सुद्धा पोहोचत नाहीत.जंगलाच्या मध्यावर प्रचंड शांततेचा अनुभव येतो,जेथे केवळ प्राणी आणि पक्ष्यांचे आवाजच  केवळ ऐकू येतात.

                    वासोट्याच्या  दोन बाजूना  तीव्र उताराचे कडे आहेत. उरलेल्या दोन बाजूंकडून बाजूकडून आपणास वासोटयावर चढाई करता येते.समुद्र्सपाटीपासून हा किल्ला ३८४२ फुट उंच आहे.गडाच्या प्रवेशद्वाराजवळून डावीकडील तटबंदीच्या कडेने जाऊन पूर्वेकडील बाजूस पोहोचल्यावर शिवसागर  जलाशयाचा आणि अथांग पसरलेल्या जंगलाचा देखावा आपल्याला मुग्ध करतो.किल्ल्यावर पोहोचताच सर्वप्रथम मारुती मंदिर लागते.इथेच समोर थोडावेळ विश्रांती घेतल्यानंतर किल्ला पाहण्यास निघू शकतो. मारुती मंदिराच्या थोडे पुढे गेल्यावरयाच बाजूला पाण्याचे टाके आहे. हे टाके भिंतीमुळे दोन भागात विभागले गेले आहे. पिण्यायोग्य पाणी गडावर येथेच आहे.या पाण्याच्या टाकीच्या जवळच एक चुना तयार करायचा दगड आहे.येथून झाडीतून दक्षिण टोकावर गेल्यावर समोरच जुना वासोट्याचा डोंगर दिसतो. जुन्या वासोट्याच्या बाबू कड्याचे तसेच खाली गेलेल्या दरीचे दृश्य आपल्याला खिळवून ठेवते. येथून परत पाण्याच्या टाक्यांकडे येऊन उत्तर टोकाकडे निघायचे. गडावरही सर्वत्र झाडीझाडोरा वाढला असल्यामुळे गडावरच्या वास्तू त्यात लुप्त झाल्या आहेत. वाटेवर मोठ्या वाड्याचे अवशेष तसेच महादेव मंदिर आहे. तेथून पुढे उत्तरेकडील माची आहे. या माचीवर बांधकाम नाही. पण येथून दूरपर्यंतचा परिसर दिसतो. नागेश्वर सुळक्याचे दर्शन उत्तम होते. कोकणातील विस्तृत प्रदेशही येथून न्याहाळता येतो. वासोटा हा गिरिदुर्गाबरोबरच वनदुर्गसुद्धा आहे. म्हणून याला 'मिश्रदुर्ग' म्हटले जाते. 


           दुर्गसफरींची आवड असलेल्यांसाठी वासोटा ही एक पर्वणीच आहे.म्हणून एकदा तरी वासोटा सफर करावी हे नक्कीच...आणि हो गड चढायला जाताना स्वतःबरोबर भरपूर पाणी घेऊन जाण्यास विसरू नका...ह्या दुर्ग सफरीसाठी नोव्हेंबर ते मार्च हे महिने सगळ्यात उत्तम परंतु पावसाळ्यात शिवसागर जलाशयात पाणी वाढल्यास बामणोली ते वासोटा मार्ग बंद असतो हे लक्षात असू द्या..... :-) :-) :-)


No comments:

Post a Comment