गावभागातल्या त्या अरुंद गल्ली बोळातून राधिकाची सायकल सुसाट धावत होती,अडथळा आला किंवा वाटेत कोणी आलं तर "ओSSSओSSS बाजूला सरका,बाजूला सरका ब्रेक नाहीSS ब्रेक नाहीSS" ही तिची लांडगा आला रे आला ची ओरड आता लोकांना सवयीची झाली होती.लोक पण उनाड पोर आहे म्हणून हसून सोडून देत बाजूला व्हायचे तर काही जण, थांब तुझ्या बापाला आज सांगतोच म्हणत तिला दम द्यायला पुढे यायचे...पण ती ऐकतेय कुठली,आपल्या दररोजच्या धुंदीत ती जोरात सायकल पळवत होती.मुलगी म्हणून राधिकाच्या बापाने तिला कधीच बांधून ठेवली नाही,खेडेगावात राहत असून सुद्धा 7 च्या आत घरात चा नियम लावला नाही किंवा तु मुलगी आहेस म्हणून तू असंच उभं राहिलं पाहिजेस,असंच बसलं पाहिजे,असेच कपडे घातले पाहिजेत,स्वयंपाक आलाच पाहिजे, असे कुठल्याही प्रकारचे समाजाने तयार केलेले अलिखित नियम लादले नाहीत.सायकल विकत घ्यायला गेल्यावर पण तुला जी हवी ती सायकल तू निवड म्हणून सांगितले,राधिकाला ती आडव्या बार ची Hercules ची काळ्या रंगाची 26 इंचाची Axn Dx आवडली,मुलगी आहेस तुला ही सायकल चालवायला नाही जमणार असा तिचा बाप एका अक्षरानेसुद्धा बोलला नाही,पैशाच्या बाबतीत त्याने घासाघीस केली खरी पण तिच्या आवडीचीच सायकल घरी आली.
गावाच्या दुसऱ्या टोकावर त्यांचे ते जुनाट बांधणीचे घर होते.टिपिकल 70-80 च्या दशकातल्या निळू फुलेंच्या चित्रपटातल्या पाटलाच्या वाड्यासारख्या थाटणीचा त्यांचा वाडा होता. धान्य ठेवायच्या सोप्यात धान्याने गच्च भरलेल्या एका पोत्यावर गोविंदा आपल्या हातात कुठलंस पुस्तक घेऊन आपण जणू काही चिरंतन वाचण्यात मग्न आहोत असे अविर्भाव चेहऱ्यावर आणून बसला होता.पण मनात मात्र असंख्य विचारांचा कल्लोळ उठला होता.थोड्या थोड्या वेळाने त्या भक्कम आणि जाडजूड दरवाज्याच्या जवळ येऊन बाहेर बघून परत जाऊन पोत्यावर हातात पुस्तक घेऊन बसायचा. त्याच्या त्या 10 वर्षाच्या नुकत्याच पालवी फुटलेल्या मनात प्रचंड घालमेल चालू होती.त्याची हौस पुरवायची एक अवघड कामगिरी राधिकाने हातात घेतलेली. सर्वात महत्वाचे म्हणजे राधिकाची ही मोहीम त्या दोघा बहीण भांवडातील एक गुपित होतं कारण,मोहीम थोडी अवघड होती.त्यामुळेच घरच्यांना जर हे कळलं तर मिळणाऱ्या शिक्षेला दोघांनापण सामोरं जावं लागणार होतं.
इकडे गावभागातून वर निघून राधिकाची सायकल आता त्यांच्या घराच्या दिशेने निघालेली. शाळेचा घातलेला तो ड्रेस राधिकाने बदलला नव्हता कारण कामगिरी फत्ते करण्यासाठी हा ड्रेस योग्य होता,जर चुकून सापडलो गेलो तर थाप मारून द्यायची की मास्तरांच्या गरोदर बायकोने मला हे काम सांगितलंय म्हणून आलेय.कामगिरी फत्ते झालीये या आनंदात सायकलचा वेग अजून वाढतच होता कारण, कधी एकदा घरी जाऊन गोविंदाच्या हातात हा खजिना ठेवतेय असं तिला झालं होतं. अंधार पडायला लागला होता.आजु- बाजूच्या शेतांवरून दिवसभर काम करून थकलेले मजूर बाया-बापाडे आता घरी परतन्यासाठी निघालेले.
राधिकाच्या उजव्या हाताच्या बाजूला असलेल्या शेतातून म्हादबा आपला ट्रॅक्टर संध्याकाळच्या सातनंतरच्या धुंदीत जणू असा काही पळवत होता की आपण हेलिकॉप्टर उडवतोय,वर आपले हिट ट्रॅक्टर कलेक्शनची गाणी डीजे च्या लेवल ने सुरू होती.समोर थोडासा चढ आल्यामुळे सायकलचा वेग आता कमी झालेला.अंगावर घातलेल्या त्या निळ्या रंगाच्या स्कर्ट मुळे तिला उभे राहून सायकलचे पेडल मारायला थोडं अवघड होत होतं.बसल्यावर हवेमुळे उडणारा स्कर्ट डाव्या हाताने खाली ढकलायला लागायचा तर उजव्या हाताने सायकलचे हँडल हातात नीट पकडून सायकल वर ढकलायची होती भरीस भर म्हणून चढामुळे पेडल मारताना पण जोर द्यावा लागत होता.पाठीवरच्या बॅगमध्ये ठेवलेला तो खजिना सांभाळत तिला तीन तारांवरची कसरत करावी लागत होती.चढ आता चढुन झाला होता,चढाच्या बरोबर उंचवट्यावर आल्यावर त्यांचा वाडा दिसायचा.
चढ चढल्याबरोबर तिची नजर घराच्या छताच्या दिशेने गेली.घराच्या त्या कौलारू छतावर वर चढून गोविंदा कधीचा येऊन रस्त्याकडे बघत होता.अंधार पडत आलाय तायडी अजून कशी काय आली नाही या काळजीने त्याच्या मनात घर केले होते.गोविंदाला बघताच तिने उजवा हात वर उचलला व आनंदात हात हलवत जोरात ओरडली गोविंदाsss कामगिरी फत्ते रेsssss, गोविंदाने पण तिला बघून उडी मारून दोन्ही हात वर उचलले व जोरात ओरडला तायडेsss.....,काही कळायच्या आतच म्हादबाचा ट्रॅक्टर आडवा आला समोर एकदम आलेला ट्रॅक्टर बघून राधिका दचकली तिने डाव्या हाताने ब्रेक जोरात दाबला पण डाव्या बाजूकडे जास्त जोर लागल्यामुळे तोल जाऊन सायकल घसरली व रस्त्यावरच फरफटत पुढे गेली,पाठीवरची बॅग उघडी पडली आणि त्यातला तो खजिना रस्त्यावर विखुरला.इकडे डीजे च्या धुंदीत असलेल्या म्हादबाचा ट्रॅक्टरवरचा ताबा सुटलेला,ट्रॅक्टर रस्ता सोडून पलीकडच्या शेतात घुसून पलटी झाला.मोठ्याने झालेला हा आवाज ऐकून बाया-बापाडे चढाच्या दिशेने धावत गेले.
दुसऱ्या दिवशी सकाळी आठ -सव्वा आठच्या च्या दरम्यान उन्हाची एक तिरीप हलकेच त्या खिडकीतून आत डोकावत होती,राधिकाचा उशीच्या जवळ असलेला हात,तिचे विखुरलेले केस ,उजव्या डोळ्याची थोडी जास्त वर असलेली भुवई असा प्रवास करत त्या उन्हाच्या तिरपेने तिला बेशुध्दवस्थेतून उठवायचं काम चोख बजावलं.
शुद्धीत आल्यावर तिने थोडासा उठायचा प्रयत्न केला पण अपघातात उजव्या गुडघ्याला जबर मार लागलेला त्यामुळे हलण्याचा प्रयत्न करताच एक जोराची सनक तिच्या गुडघ्यापासून डोक्यापर्यंत गेली.काल नेमकं काय झालं याचा विचार करत काही काळ ती तशीच पडून राहिली,इतक्यात झाडू मारायचा म्हणून वर आलेल्या मोलकरीणने राधिकाला शुद्धीत आलेलं बघून मोठ्या साहेबांना म्हणजेच राधिकाच्या बापाला हाक मारली,मोठे साहेबsss,मोठे साहेबss, ताईसाहेबांना जाग आलीये.आलोच म्हणत..खालच्या व्हरांड्यात पेपर वाचत बसलेला तिचा बाप हलकेच हसला. पेपर घडी करून ठेवून मिशीला पीळ देत बाजूला ठेवलेली ती पिशवी त्याने उचलली व पाठीमागच्या सोप्यातुन लाकडी जिना चढू लागला.
जिना चढण्याचा तो खट-कर... खट-कर.. आवाज राधिकापर्यन्त पोहोचला , आता शिक्षा मिळणार हे नक्की असल्यामुळे त्या बिन-आईच्या लेकराच्या मनात भीतीने घर केले.
पण झाले नेमके उलटेच, राधिकाचा बाप हसत हसत आत शिरला व ताईसाहेब मोहीम फत्ते झाली की तुमची!! म्हणत तो तिच्या बाजूला येऊन बसला.विचारपूस करत असतानाच त्याने त्याच्या त्या कोल्हापुरच्या पैलवाणाच्या दणकेबाज आवाजात गोविंदाला हाक मारली.गोविंदा पळतच वर आला व येताच तायडीला येऊन बिलगला व रडू लागला,तेवढ्यात मोलकरीण बोलली,छोटे साहेब जरा दमानं ताईसाहेबांना जबर मार लागलाया...
दोघा भावंडांकडे आईच्या मायेने बघत त्यांच्या बापाने ती पिशवी पुढे केली व म्हणाला,"दुसऱ्याच्या शेतातून चोरून आणलेल्या कैऱ्यांची चवच वेगळी लागते रे पोरांनो"!!!
--अव्यक्त
सही आहे भावा
ReplyDeleteअसाच लिहीत राहा
मज्जा आली