पाऊस पडायला लागला की तिची आठवण हमखास यायची.कारणच तसं होतं...पावसामध्येच तर तिने त्याला विचारलेलं.त्यांच्या कॉलेज पासून जेमतेम 2-3 किलोमीटर वर असेल तो धबधबा...एरवी उन्हाळ्यात पिरबाबाचा तो काळा खडक ओबडधोबड,निर्जीव आणि निस्तेज दिसायचा पण पाऊस सुरू झाला की मात्र त्याला नवीनच ऐट चढायचा.श्रावणात तर वरपासून खालपर्यंत हिरव्या गवताची चादर घेऊन पावसाची साद घेत तो पिरबाबाचा धबधबा जानेवारीच्या अखेरपर्यंत तर अखंड कोसळत असायचा.
ऑफिस नुकतंच सुटलेलं होतं पण त्याला यावेळी पावसात एकटं नव्हतं भिजायचं.गेल्या पाच वर्षांमधला हा एकच पावसाळा असा होता की ज्यावेळी तो एकटा होता.इराणी कॅफे मध्ये बसल्यावर समोर वाफाळलेला चहा आलेला,पण या वेळी कुरकुरीत कांदा भज्यांच्या ऐवजी ती एक्सट्रा फायबर असलेली बेचव बिस्किटे सोबत होती. मन बंड करून उठत होत.थोड्याश्या गडबडीत अधाशीपणेच चहा घेत त्याने सुज्या ला फोन लावला.सुज्या ने फोन उचलताच आपल्या कोल्हापुरी सुसभ्यपणाचे दर्शन देत "बोल की भावा"म्हटले आणि दोघे पुढच्या अर्ध्यातासात त्या पिरबाबाच्या डोंगराकडे बाईक वरून निघाले सुद्धा.आकाशात दाटून आलेल्या त्या काळया ढगांना पण आता कळून चुकलं होतं,
"प्यार का नशा अब चढ राहा है...और बरसो वरना ये आशिक प्यासा ही रेह जायेगा."
सायलेन्सर काढून टाकलेली सुज्या ची ती RX 100 आता हायवे सोडून आत वळत होती...समोरचा तो घाट बघता सुज्या ने गाडी कधी दुसऱ्या किंवा तिसऱ्या गियर वर निवांत घ्यायची ठरवली आणि दरवेळच्या चालीत "ये दोसती हम नही तोडेंगे..." म्हणायला सुरवात केली व पाठीमागे बसलेल्या "त्याने" पण आपल्या दरवेळच्या सवयीप्रमाणे त्याला साथ द्यायला सुरुवात केली...आती क्या खंडाला, उर्वशी उर्वशी,दिल तो पागल है करत गाडी अमीना चाचीच्या चहाच्या टपरीजवळ येऊन पोहोचली आणि गाडी बंद करतच सुज्या ने ऑर्डर सोडली "अमीना चाची दो प्लेट वंटास कांदा भजी और दो चाय, मलाई मार केSSSSS".बऱ्याच दिवसांनी सुज्याला आणि "त्याला" बघून अमीना चाचीला पण आनंद झाला व त्यांच्या हातात कोरडा टॉवेल देत अमीना चाची म्हणाली "हातात चार पैसे जास्त आले तर आईला विसरला होय रे..."
त्यावर आपल्या सुज्याचा खणखणीत डायलॉग पडला...
"अरे अम्मी एक दिन ऐसा वक्त आ सकता है की सुरज भूल जाये आज पुरब कहा है...पर खुशी हो या गम सबसे पहले याद तो माँ की ही आनी है..."पाणावलेल्या डोळ्यांनीच अमीना चाची ने भजी तळायला घेतली आणि बाजूच्याच गॅस वर चहा ठेवला.
"तिची" सकाळ तर आता उजाडलेली. त्या आलिशान बेड च्या बाजूला असलेला तो अलार्म जोरजोरात गात होता "हे इट्स गुड मॉर्निंग,इट्स गुड मॉर्निंग...", मॅडम मात्र अजून पण गाढ झोपेत होत्या...आणि तेवढ्यातच तिचा मोबाइल वाजू लागला. "लोकांची झोप मोड करणे हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे" असं सुज्या अभिमानाने सांगायचा,द सिक्रेट मधल्या law of attraction ने आपले काम चोख बजावले आणि मॅडम आपल्या चिरनिद्रेतुन चक्क जाग्या झाल्या.सुज्या चा तो कोलगेट च्या स्माईल वाला स्क्रीन वरचा फोटो बघून तिने फोन उचलताच म्हटले,
"सकाळी सकाळी मला तुझ्यासारख्या माकडाचा आवाज नाहीये ऐकायचा...पहिल्यांदा "त्याच्या"कडे दे फोन मग आपण बोलू"
सुज्या हे ऐकायला जणू तयारच बसला होता.भावा "वहिणीसाहेब" म्हणत सुज्या ने फोन "त्याच्या"कडे दिला.
त्याने गुड मॉर्निंग म्हणताच तिने विचारले..."भिजून बास झालंय की अजून भिजायचं आहे..."
त्याच्याकडून उत्तर आले..."पाऊस तर खूप पडतोय पण भिजायला आता सुरवात झालीये."
या पावसामध्ये मात्र दोघे पण भिजायला जणू तयारच होते...उत्तर आले,"बुखार चढ जायेगा जनाब थोडा संभलंके,वरना इस दिवानी को ये परदेस छोडके के वापस आणा पडेगा."
या फुल टॉस वर सिक्सर मारत तो म्हणाला
"अगर हमे बुखार चढणे से आप यहा आ जाओगे तो हम जिंदगी भर मरीज ही रेहना ही पसंद करेंगे..."स्टेडियमच्या बाहेर उडालेला हा सिक्सर तिने तिच्या खळखळून हसण्यात पकडला आणि बेडवर उठून बसत विचारले "कसा आहेस?"
मी सध्या तरी 'ठीक', पण 'पाऊस' पडतोय...त्याच्या या बोलण्याला कात्रीत पकडत ती बोलली की "ठीक आणि पाऊस" या दोन्ही गोष्टी एकत्र नाही असू शकत साहेब!
एक तर तू ठीक आहेस किंवा तिथे फक्त पाऊस.
"पाऊस",त्याच्याकडून उत्तर आले.जणू काही आपल्याला माहितीच नाही अशा अविर्भावात तिने बोलायला सुरुवात केली,"अच्छा तर असं आहे का मग", तो बोलला "हो असंच आहे" आणि मग दोघेपण मनमोकळेपणाने हसले.
मला ऑफिस साठी निघायचय...मला आवरायचंय,
मी कुठे म्हणतोय तू आवरू नकोस.
उशीर होईल!!!
नाही होणार,घड्याळ बघ 6 वाजलेत सकाळचे, ऑफिस 9 वाजता आहे अजून 3 तास आहेत आपल्याकडे बोलायला.
तू खरंच 3 तास बोलू शकशील का "माय फ्युचर हसबंड?"तिने हसत हसत विचारले
"ये बारीश और मोबाईल की बॅटरी साथ दे तो हम आपसे दिनभर बातें ही करते रहेंगे माय फ्युचर वाईफ." त्याने पण हसत हसत उत्तर दिले.
तेवढ्यात अमीना चाचीने गरमागरम कुरकुरीत भजी आणि मस्त वाफाळलेला चहा समोर आणून ठेवला होता...दरवेळप्रमाणे डायल करून केलेला कॉल कधी व्हीडिओ कॉल झाला ते दोघांच्यापण लक्षात आले नाही...अमीना चाची तुझ्या हातची भजी आणि चहाची मला खूप आठवण येते...तिने तिकडून जोरात हातवारे करत ओरडून सांगितले...अमीना चाची ला पोर नीट आहे हे बघून हायसे वाटले...तब्येतीला सांभाळ पोरी म्हणत अमीना चाची दुसऱ्या गिऱ्हाईकांडके वळली.
तेवढ्यात सुज्या ने डोके मध्ये घालत म्हटले "वहिणीसाहेब" हा पावसाळा हयाला एकट्यानेच काढावा लागेल असं दिसतंय.तिने उत्तर दिले "मी भेटल्यापासून एक तरी पावसाळा ह्याचा एकट्याने गेलाय का...मी तर त्याच्या जवळच असते कायम".तिच्या या गुगलीवर क्लीन बोल्ड होत आपले इथे काही काम नाही हे लक्षात घेत सुज्या ने काढता पाय घेतला आणि तो गाडीजवळ जाऊन सिगारेट ओढत उभा राहिला...
हातात चहा घेऊन "त्याने" पाय धबधब्याकडे वळवले.पाण्याचा कोसळणारा आवाज आता तिच्यापर्यन्त पोहोचत होता...धबधब्याकडे जाणारी वाट आता थोडीशी निसरडी झाली होती.तरी तोल सांभाळत तो हळू हळू चालत होता.दोघेपण आता निशब्ध होते...पण मनात मात्र प्रेमाचा पाऊस सुरू झालेला.चिखलाने माखलेले पाय ओढत तो तिथे येऊन पोहोचला.तिने तिकडून विचारले
"किती वाढलंय आपलं झाड!?"
त्याने उत्तर दिले...
"तेवढंच जितकं आपलं प्रेम!!"
--अव्यक्त
Khup sunder ...apratim..❤❤😊
ReplyDelete